सा.बां. विभागाचा ढिम्म कारभार; तीन वेळा शब्द देऊनही रस्ता अपूर्ण
| रोहा | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी आणि ढिम्म कारभाराचा फटका चणेरा परिसरातील नागरिकांना गेली चार वर्षे बसत आहे. चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसरमार्गे रोहा या महत्त्वाच्या राज्य मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असून, 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे तीन वेळा लेखी आश्वासन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी शब्द पाळला नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली चणेरा ग्रामस्थांनी उद्या सोमवारी (1 जून) चणेरा नाक्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
रोहा-चणेरा हा पर्यायी दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून शासनाने चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसर मार्गे रस्त्यास मंजुरी देत तब्बल पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, काम सुरू होऊनही चार वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे, काम अपूर्ण असतानाच संबंधित ठेकेदाराला देयके अदा करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
या रस्त्याचा काही भाग वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतरच काम पूर्ण होईल, असे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार पुढे करण्यात आले. यासाठी विभागाने वन खात्याशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत संथ राहिला आहे.
यापूर्वी 14 एप्रिल रोजीही ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी रोहा पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बागुल यांनी वन विभागाची परवानगी मिळवून 31 मे 2026 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, दिलेली मुदत संपल्यानंतरही काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
वारंवार आश्वासने देऊनही काम पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अध्यक्ष प्रकाश विचारे, सुरेश मोरे आणि अरुण खानविलकर यांनी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
