उद्या खालापूर प्रेस क्लबचा वर्धापनदिन

विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार
| खोपोली | प्रतिनिधी |

रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबचा 14 वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 24 रोजी खोपोली लायन्स क्लबच्या डॉ. रामहरी धोटे सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खा. श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे प्रमुख पाहुणे म्हणून व विशेष अतिथी म्हणून माजी आ. सुरेश लाड, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उद्योजक यशवंत साबळे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी खास पत्रकारांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले असून, यात आघाडीच्या वृत्त निवेदिका सुवर्णा धानोरकर, विलास बढे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

वर्धापन दिनानिमित्त खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यात आदर्श सामाजिक कार्य म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम साळवी, आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जि.प. सदस्य नरेश पाटील, आदर्श प्रशासकीय अधिकारी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, आदर्श महिला उद्योजिका म्हणून सुरेखा खेडकर, आदर्श बिल्डर म्हणून कल्याणी ग्रुपचे संचालक खेमंत टेलर व खोपोली गॅस कंपनीचे उदय साखरे, आदर्श सरपंच म्हणून अंकित साखरे, आदर्श डॉक्टर म्हणून डॉ. हेमंत पाटील, डॉ. प्रसाद पाटील, आदर्श ग्रामपंचायत म्हणून खरीवली ग्रामपंचायत, आदर्श क्रीडा प्रशिक्षक म्हणून शीतल गायकवाड, आदर्श सामाजिक संस्था म्हणून सहज सेवा फाऊंडेशन, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन तसेच राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार म्हणून सुवर्णा धानोरकर व जीवन गौरव पुरस्कार खोपोलीचे माजी नगराध्यक्ष व वरिष्ठ राजकीय नेते दत्ताजी मसुरकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Exit mobile version