उद्या रोह्यात रोजगार मेळावा

। रोहा । प्रतिनिधी ।
अलिबाग, मुरुड येथील रोजगार मेळाव्यांना उदंड प्रतिसाद लाभल्यानंतर आता बुधवारी (दि. 12) रोहा तालुक्यातील सानेगाव हायस्कूलच्या पटांगणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सुमारे तीन हजार युवक, युवती सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडणार आहे.

रोहा तालुक्यात हेमंत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नंदेश यादव, अमोल शिंगरे, संतोष दिवकर, गौरव मढवी, रत्नदीप चावरेकर, रवींद्र झावरे, परेश म्हात्रे, राज जोशी, तानाजी म्हात्रे यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत युवकांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. युवकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी शेकापकडून होत असलेल्या प्रयत्नांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

तालुक्यातील अन्य पक्षांनी केवळ सत्ता उपभोगली, पण शेकाप नेतृत्वाने मात्र तालुक्यातील युवकांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू केलेल्या उपक्रमासाठी उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी कौतुक केले असून, या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात सुमारे 50 कंपन्या सहभागी होणार असून, इयत्ता आठवी पासपासून पदवीधारक अशा सर्वांसाठी रोजगार उपलब्ध होणार असल्याने ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे. त्यांनी बुधवारी सकाळी 10 ते 4 यावेळेत या रोजगार मेळाव्यात येऊन नोंदणी करावी. तसेच या मेळाव्यात येताना आपली शैक्षणिक व अनुभव असल्यास त्या संदर्भातील कागदपत्रे घेऊन हजर राहावे, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस राजेश सानप यांनी केले आहे.

Exit mobile version