। अलिबाग । प्रतिनिधी ।
कृषीवल म्हणजे रायगडच्या वृत्तपत्र चळवळीचा बुलंद आवाज, सामाजिक, राजकीय घटनांचा साक्षीदार आणि बदलत्या परिस्थितीचा वेगवान व अचुक ठाव घेणारा वृत्तांकनातील हिरा! असे हे लोकाभिमुख असलेले, रायगड जिल्ह्यातील जनमानसांत पोहचलेले कृषीवल मंगळवारी (दि.7) 87 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कृषीवल वर्धापनदिन सोहळा साधेपणानेच साजरा करण्यात येणार आहे.
सामाजिक व राजकीय चळवळ बहुजन समाजाच्या हितासाठी पुढे चालु ठेवण्याकरीता आपल्या हातामध्ये वर्तमानपत्र असणे अत्यंत जरुरीचे आहे, ही काळाची गरज ओळखून कै. ना.ना. पाटील यांनी 1936 साली कृषीवलची स्थापना केली. आठ दशकांपूर्वीचा काळ संघर्षाचा होता. लेखणीद्वारे अन्यायाला वाचा फोडणारा होता. कै. ना.ना. पाटील यांच्या लढ्यात, शेतकर्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे, बहुजन समाजाचे वास्तव रुप शासकीय पटलावर आणणारे आणि तथाकथित पांढरपेक्षा विचारांशी फारकत घेणारे वृत्तपत्र म्हणून कृषीवल एखाद्या योध्याप्रमाणे कामगिरी करत होता आणि आजही करीत आहे.
कै. ना.ना. पाटलांनी कृषीवलच्या वृत्तांमधून अनेक वैचारिक बिजे पेरली. त्यांच्या पश्चात कै. प्रभाकर पाटील, कै. दत्ता पाटील या पिढीने कृषीवलची वैचारीक बैठक सर्वोच्च स्थानी नेली. त्यानंतर आ. जयंत पाटील व सौ. सुप्रिया पाटील यांनी वृत्तपत्र जगतात कृषीवलला वेगळे स्थान निर्माण करुन दिले. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील व माजी आ. पंडित पाटील यांनी कृषीवलच्या पुढील जडणघडणीत नवविचार दिले.
आता कै. नाना पाटील यांच्या चौथ्या पिढीची प्रतिनिधी म्हणून चित्रलेखा पाटील अतिशय कौतुकास्पद कामगिरी करत कृषीवलचा कारभार पाहत आहे. रायगडच्या वृत्तपत्र जगतात मानाचे स्थान असणारे कृषीवल आज ही बहुजन सुखाय, बहुजन हिताय या भुमिकेतून उभे आहे.
लोकाभिमुख दैनिक कृषीवलच्या माध्यमांतून बदललेले डिजीटलचे स्वरुप उत्तरोत्तर प्रभावी काम करीत आहे. गेली आठ दशके कृषीवलने अखंडपणे वृत्तांकन केले आहे. तसेच विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रसिद्ध करण्याला प्राधान्य दिले. यापुढेही तुमच्या साथीने कृषीवल असेच कार्य करीत राहील.