। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. सभा बैठकांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात संपूर्ण राजकीय वातावरण तापले होते. अखेर सोमवारी सायंकाळी साडेपाचनंतर प्रचारतोफा थंडावणार आहेत. बुधवारी (दि.20) मतदान होणार असून, मतमोजणी शनिवारी (दि.23) विधानसभा मतदानसंघात होणार आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र चार नोव्हेंबरला स्पष्ट झाले. 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षातील उमेदवारांनी सभा, बैठकीच्या माध्यमातून आपापल्यापरीने प्रचार केला. आरोप-प्रत्यारोप करीत आपली बाजू मांडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचार संपण्यासाठी काही तासच शिल्लक राहिले आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी शर्थीचे प्रयत्न केले. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात 24 लाख 88 हजार 788 मतदार असून, दोन हजार 790 केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55 हजार 893 मतदार, 85 वर्षांपुढील 35 हजार 863, दिव्यांग 13 हजार 191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत. त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षांवरील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.