उद्या मिनीडोअर चालकांचा मोर्चा

प्रलंबित मागण्यांसाठी हजारो चालक रस्त्यावर उतरणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या शुक्रवारी (दि. 12) सकाळी रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबागमध्ये धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. न्यायासाठी जिल्ह्यातील हजारो चालक रस्त्यावर उतरणार आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, या मोर्चासाठी चालक व मालक सज्ज झाले आहेत.

तीन चाकी, सहा आसनी मिनीडोअर वाहनांची सरसकट दोन वर्षे वयोमर्यादा वाढविण्यात यावी, चारचाकी सहा आसनी बीएस फोर मानांकीत बदली वाहनांकरिता इंधन म्हणून सीएनजीच्या वापरास मान्यता मिळावी, कोरोना काळात लागू झालेले सानुग्रह अनुदान विक्रम, मिनीडोअर मॅजिक इको या मीटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे, व्यवसाय कराचा भरणा करण्यासाठी दंड व व्याज न आकारता सूट मिळावी. इको टॅक्सीला नवीन डिव्हाईस बसविण्यासाठी अतिरिक्त खर्च होत आहे. ही तांत्रिक लूट थांबविण्यात यावी. ऑनलाईन टॅक्सी परमीट बंद करावे. 15 वर्षांवरील मिनीडोअर पासिंग साडेचार हजार रुपयांवरून नऊ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे, ती रद्द करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मिनीडोअर चालक मालक लढा देत आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या चालक व मालकांनी शुुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हा स्तरावर बैठका झाल्या. या बैठकीच्या माध्यमातून मोर्चाची तयारी करण्यात आली आहे. हा लढा तीव्र स्वरुपाचा असून, न्याय मिळेपर्यंत राहणार आहे, असे विजयभाऊ पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version