| रसायनी | प्रतिनिधी |
आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर (इको रिक्षा) चालक-मालक संघटनेने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाके देवी चालक-मालक संघटना मोहोपाडा अध्यक्ष विकास पारंगे, उपाध्यक्ष बाळाराम कुरंगळे यांच्यावतीने संघटनेच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी स्वीकारले. या मोर्चात मोठ्या संख्येने विक्रम मिनिडोअर चालक-मालक सहभागी झाले होते.
या निवदेनात, सहा आसनी मिनीडोअर वाहनांची ग्रामीण भागासाठी पाच वर्षे वयोमर्यादा वाढविण्यात यावी. चारचाकी सहा आसनी बीएस फोर मानांकीत बदली वाहनांकरिता इंधन म्हणून सीएनजीच्या वापरास मान्यता मिळावी. कोरोना काळात लागू झालेले सानुग्रह अनुदान विक्रम, मिनीडोअर, मॅजिक इको या मीटर टॅक्सी परवानाधारकांना मिळावे. व्यवसाय कराचा भरणा करण्यासाठी दंड व व्याज न आकारता सूट मिळावी. इको टॅक्सीला नवीन डिव्हाईस बसविण्यासाठी अतिरिक्त खर्च होत आहे, त्यामुळे ही तांत्रिक लूट थांबविण्यात यावी. ऑनलाईन टॅक्सी परमीट बंद करावे. 15 वर्षांवरील मिनीडोअर पासिंग साडेचार हजार रुपयांवरून 9 हजार रुपये इतकी करण्यात आली आहे, ती रद्द करण्यात यावी, अशा अनेक मागण्या मोर्चाच्या माध्यमातून विक्रम मिनिडोअर धारकांनी केल्या आहेत.







