उद्या रंगणार शेकाप पुरस्कृत मानाच्या दहीहंडीचा थरार

प्रशांत नाईक मित्रमंडळा तर्फे आयोजन; जिल्ह्यात आठ हजार 509 दहीहंड्या


। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित अलिबाग शहरामध्ये मंगळवारी (दि. 27) मानाची हंडी फुटणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अलिबागकरांसह परिसरातील लाखो नागरिकांना प्रत्यक्षात तसेच स्थानिक केबलच्या शंभर नंबर चॅनेलवर आणि युट्यूबर प्रो लिंक स्पोर्ट्सद्वारे एक वेगळा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आठ हजार 509 दहीहंड्या फुटणार आहेत.

शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, दहीहंडी उत्सवासाठी 52 गोविंदा पथकाने नोंदणी केली आहे. प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या गोविंदा पथकाला (पुरुष) रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहेत. यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पथकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणार्‍या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्‍या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.

कृष्णजन्मष्टमीनंतर मंगळवारी जिल्ह्यात दहीहंडी सोहळा रंगणार आहे. डिजे व गाण्यांच्या ठेकावर नाचत मिरवणूक काढली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 177 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. काही ठिकाणी सकाळी, तर काही ठिकाणी दुपारनंतर मिरवणुका काढून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. एकूण आठ हजार 509 दहीहंड्या उभारल्या जाणार आहेत. त्यात खासगी सहा हजार 641 व सार्वजनिक एक हजार 868 दहीहंड्यांचा समावेश आहे. या दिवशी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

रिल्स स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव मंगळवारी अलिबागमध्ये शेतकरी भवनसमोर रंगणार आहे. दुपारी तीन वाजल्यापासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. या उत्सवावर आधारित रिल्स स्पर्धा आयोजित केली आहे. रिल्सचा कालावधी तीस सेकंदांचा असणार आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यातील प्रथम क्रमांकाला दहा रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला सात हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.
यू ट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण
घरबसल्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी आयोजकांकडून यू ट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्थानिक केबलच्या शंभर नंबर चॅनेलवर आणि यू ट्यूबर प्रो लिंक स्पोर्ट्सद्वारे एक वेगळा आनंद घेता येणार आहे.

दहीहंडी सोहळा आनंदात साजरा करता यावा यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी महिलांची गर्दीदेखील होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील बंदोबस्त राहणार आहे. नागरिकांनी पोलिसांना योग्य ते सहकार्य करून हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

Exit mobile version