पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशनधारकांना गहू न देताच ग्राहकांकडून गहू दिल्याबाबत अंगठा घेऊन ऑनलाईन नोंद केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत जागरूक नागरिकांकडून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुरवठा विभागाने हमाल संपामुळे गहू वितरित करता आला नाही, असे कारण देऊन दोन्ही महिन्यांचा एकाच वेळेस गहू दिला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.
महाड तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्याचा येणारा गहू पुरवठा झालेला नाही. शिवाय, रेशन दुकानदारांनाही गहू न मिळाल्याने रेशन ग्राहकांना मात्र गहू दिल्याचे अंगठा घेऊन भासवण्यात आले. शाश्वत धेंडे या सामाजिक कार्यकर्त्याने हा घोळ उघडकीस आणला आहे. चौकशी केली असता संकेतस्थळावर गहू देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गहू मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच स्थिती झाली असल्याचे दिसून येत आहे. गहू का देण्यात आले नाही याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आले आहे.
महाड तालुक्यातील अकरा गावे माणगाव पुरवठा विभागाला जोडली गेली आहेत. या अकरा गावांमध्येच गहू मिळाला नसल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गहू साठा असला तरी हमाल संपामुळे गहू पुरवठा करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या 11 गावांमध्ये पाचाड, वाळसुरे, खर्डी, कोळसे, महाड 3, सांदोशी, सावरट, रायगडवाडी, कोंझर या गावांचा समावेश आहे. ग्राहकांना शिधा देताना गहू न देताच केवळ तांदूळ देऊन अंगठा घेऊन गहू घेतल्याचे दाखवन्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुभाष मोरे यांनीदेखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
किल्ले रायगड परिसरातील अनेक गावातील नागरिकांकडून फक्त अंगठा घेऊन प्रत्यक्षात त्यांना गहू देण्यात आलेला नाही. याबाबत ऑनलाईन नोंदी दिसून येत असून, या प्रकाराची संपूर्ण चौकशी केली जावी.
सुभाष मोरे
मार्च महिन्यातील गहू तालुक्यातील 11 रेशनिंग दुकानांवर वितरित झालेला नाही, ही दुकाने माणगाव व पुरवठा विभागाशी जोडली गेलेली आहेत. शिवाय, हमालांचा संप सुरू असल्यामुळे धान्य वितरण करता आले नाही. त्यामुळे अंगठा घेतला असला तरी गहू अंगठा घेतलेल्या सर्व नागरिकांना दिला जाईल.
योगिता सत्यगिरी,
पुरवठा नायब तहसीलदार, महाड