| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात हजारो वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून, कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात पाच धरणे बांधली जात असून, कर्जत तालुका भविष्यात भूकंप प्रवण तालुका बनणार आहे.
तालुक्याच्या दक्षिण दिशेला उल्हास नदीवर कोंढाणे धरण सिडकोकडून बांधले जात आहे. तर पूर्व भागात पोटल पाली आणि कोतवाल खलाटी भागात टोरंट तर भिवपुरी भागात पेज नदीवर टाटा आणि बोरगाव येथील पोश्री नदीवर पोशीर धरण आणि चिल्हार नदीवर शिलार येथे शिलार धरण होणार आहे. ही पाचही धरणे तालुक्याच्या दोन दिशेला बांधली जाणार आहेत. या पाचही धरणामुळे कर्जत तालुक्यातील नद्या पावसाळ्यात देखील कोरड्या राहण्याची शक्यता आहे. तालुक्यात गरज नसताना पाच धरणे बांधली जाणार असल्याने भूकंपाच्या छायेत तालुका येणार आहे.
तसेच प्रकल्पासाठी शेतकरी जमीन घेतली जाईल आणि शेती क्षेत्र कमी होणार आहे, आणि स्थानिक अन्ननिर्मितीवर परिणाम होईल. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातील. झाडतोडीमुळे जंगलातील प्राणी, पक्षी व कीटकांचे अधिवास नष्ट होतील. जैवविविधता कमी होईल; काही प्रजातींचे लुप्त होण्याचा धोका आहे. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागेल, त्यामुळे शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करू शकतात. पावसाचे पाणी अडवल्याने हे पाणी नद्या, ओढे आणि तलावात मिसळल्यास जलचर प्राणी आणि मासे प्रभावित होतील. भूजल स्तर कमी होईल, पाणी साठवण्याची क्षमता कमी होईल. प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार असल्यामुळे परिसरात उष्णता वाढेल. मातीची ओलसरता कमी होईल. पावसाळ्यात भूस्खलन व मातीची धूप होईल. पक्षी व कीटक कमी होऊन परागीकरण आणि फळ उत्पादनावर परिणाम होईल. मानवी आरोग्यावर परिणाम तसेच हवा व पाणी प्रदूषणामुळे श्वसन, हृदय, त्वचा व पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्जत तालुक्याचा ऱ्हास करणारी प्रकल्प सरकारने रद्द करावेत यासाठी मोठे आंदोलन कर्जत तालुक्यात उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.







