मुसळधार पावसाने भातशेती जलमय; शेतकऱ्यांची चिंता वाढली 

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

खालापूर तालुक्यासह परिसरात प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. सर्वत्र पाणी साचल्याचे चित्र दिसत असून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

भात लागवडीपूर्वी तयार करण्यात आलेले राब पाण्याखाली गेल्याने ते कुजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी यंदाच्या भात हंगामावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतात कोणतीही मशागत करता येत नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. पेरणी, रोपांची लागवड आणि इतर हंगामी कामांना अक्षरशः ब्रेक लागला आहे.

दुसरीकडे नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे शेतात प्रवेश करणेही अशक्य बनले असून, शेतकरी हतबल झाले आहेत. हवामानात लवकर सुधारणा होऊन पावसाची तीव्रता कमी व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Exit mobile version