लग्नाच्या आमिषाने अत्याचार; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

| तळा | वार्ताहर |

तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी साजिद कुरुक्कर (28) याने तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मुरुड येथे एका लॉजवर घेऊन जात तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडित तरुणीच्या मोठ्या बहिणीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत तळा पोलीस ठाणे येथे आरोपी साजिद कुरुक्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे हे करीत आहेत. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तळा पोलीस ठाणे येथे एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आरसीपी प्लाटूनच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. त्यामुळे तळा बाजारपेठेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील तणावाचे वातावरण शांत झाले.

Exit mobile version