। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका 70 वर्षाच्या इसमाने 16 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने ती 4 महिन्यांची गरोदर राहिली होती.या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील भांनग गावातील आरोपी मारुती आंबेकर याच्या घरी सदर पीडित मुलगी टीव्ही पाहण्यासाठी जात असे.पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी मारुती आंबेकर याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. यामुळे सदर मुलगी ही 4 महिन्यांची गरोदर राहिली होती. त्यामुळे आरोपी आंबेकर याने मुलीच्या आईला मुलीला उपचारासाठी मुंबईला घेऊन जातो असे सांगून आपला मुलगा रोहित मारुती आंबेकर याच्या साथीने डोंबिवली येथील नारायण हॉस्पिटलमध्ये सदर मुलीचा गर्भपात केला. सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच तळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत जाऊन आरोपी मारुती आंबेकर व रोहित आंबेकर यांना अटक केली. तसेच तळा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे हे करीत आहेत.