। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील खालापूर वनक्षेत्रातील मौजे कलोते मोकाशी येथील कॅम्प मॅक्स या हॉटेलने केलेल्या अनधिकृत बांधकामावर वनविभागाने हातोडा टाकला असून येथील अनधिकृत बांधकाम शनिवारी (दि.2) उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आले. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार संबंधितास कायदेशीर संधी देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
अलिबाग वनविभागातील खालापूर वनक्षेत्रामध्ये निगडोली परिमंडळाच्या हद्दीत दि.1 मार्च 2021 रोजी मौजे कलोते मोकाशी संरक्षित वन गट नंबर 363मध्ये जगमितसिंग उपपालसिंग सबरवाल, रा. कलोते मोकाशी यांनी कॅम्प मॅक्स या नावाने अनधिकृत हॉटेल व्यवसायासाठी रेस्टोरंट/बार, पॅगोडा, स्वयंपाकघर, सामान कक्ष, बांबू झोपड्या, 22 टेंट, शौचालय, बाथरूम, ओपन थिएटर, अंतर्गत रस्ते, बॅटमिंटन बोर्ड, टेनिस मैदान, डॉग हाऊस, पक्षी घर, टेबल टेनिस, कोर्ट, वॉश रुम, रोपे लागवड क्षेत्र, लॉन, गार्डन, इ. करिता 1.09.16 हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते.
याबाबत कॅम्प मॅक्स तर्फे जगमितसिंग उपपालसिंग सबरवाल, रा. कलोते मोकाशी याच्याविरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन हे प्रकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 53, 54 व 237 खालील कार्यवाही तसेच आदेशाकरिता प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) पनवेल यांच्याकडे सादर करण्यात आले. प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) पनवेल यांनी या प्रकरणाची अंतर्गत चौकशीची रितसर कार्यवाही पूर्ण करुन तसेच या प्रकरणातील गैर अर्जदार (प्रतिवादी) जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल, रा. कलोते मोकाशी यांना त्यांनी मौजे कलोते मोकाशी संरक्षित वन गट नंबर 363 मध्ये हॉटेल व्यवसायाकरिता केलेल्या अतिक्रमणासंबंधी नैसर्गिक न्याय हक्काच्या दृष्टीने या कृतीबाबत त्यांचे मालकी हक्क सिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडील पुराव्यासह म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आली. परंतु ते कोणत्याही प्रकारे नमूद क्षेत्रात केलेले अतिक्रमण त्यांच्या मालकीच्या क्षेत्रात असल्याचे सिद्ध करु शकलेले नाहीत व तसे कोणतेही पुरावे देखील सादर केलेले नाही. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक वनसंरक्षक (प्रादे. व वन्य) पनवेल यांनी केलेल्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिद्ध झाले असल्याने प्राधिकृत अधिकारी यांनी जगमितसिंग उषपालसिंग सबरवाल यांना संबंधित अतिक्रमित वन क्षेत्र 7 दिवसात स्वत:हून मोकळे करण्याचे आदेश दिले.
मात्र नोटीस देऊनही दिलेल्या 7 दिवसाच्या मुदतीत अतिक्रमणधारक यांनी अतिक्रमण न काढल्याने हे अतिक्रमण आज दि.2 एप्रिल रोजी उपवनसंरक्षक,अलिबाग श्री. आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक, पनवेल यांच्या उपस्थितीत पनवेल उपविभागातील वनक्षेत्रपाल खालापूर, कर्जत (पूर्व पश्चिम), पनवेल, उरण व माथेरान या क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी या सर्वांच्या तसेच पोलीस विभागाच्या मदतीने निष्काषित करण्याची धडक कारवाई करण्यात आली.