118 वर्षांचा इतिहास उलगडणारा स्थानक महोत्सव
| माथेरान | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान लाइट रेल्वेच्या 118 वर्षांच्या गौरवशाली वारशाचा साक्षीदार ठरलेला माथेरान स्थानक महोत्सव शनिवारी (दि. 13) मध्य रेल्वेकडून उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार आयोजित या महोत्सवात ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन, दुर्मिळ रेल्वे वारसा साहित्य आणि अत्याधुनिक डिजिटल सादरीकरण ही खास आकर्षणे ठरली.
माथेरान स्थानक परिसरात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात माथेरान लाइट रेल्वेच्या वैभवशाली इतिहासाशी निगडित मूळ आणि आजही अस्तित्वात असलेल्या रोलिंग स्टॉकचे सादरीकरण करण्यात आले. स्टीम लोको 794बी, चारचाकी बोगी फ्लॅट रेल (बीएफआर) वॅगन, दार्जिलिंग हिमालयन रेल्वेची नॅरो गेज बोगी तसेच माथेरान लाइट रेल्वेच्या बोग्यांनी पाहुण्यांचे लक्ष वेधले. बार्शी लाइट इंजिनचे कार्यरत मॉडेल, जुन्या काळातील स्थानक कर्मचाऱ्यांचे बॅज, पॉइंट्समनचे पट्टे, हातघंटी, लाकडी रोख पेटी, मोजमाप काटे, सिग्नलिंग दिवे, तेलाचे कॅन, पाणी देण्यासाठीचे ग्लास, काचेचे निगेटिव्ह अशा दुर्मिळ वारसा वस्तूंमुळे प्रदर्शनाला इतिहासाचा जिवंत स्पर्श मिळाला. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत व्हीआर ऑक्युलस चष्म्यांद्वारे नेरळ-माथेरान मार्गाची 360 अंशांतील व्हर्च्युअल सफारी अनुभवण्याची संधी अभ्यागतांना देण्यात आली. यासोबतच नेरळ-माथेरानशी संबंधित डायऱ्या, कॉफी मग्स, टी-शर्ट आणि की-चेन यांसारखी स्मृतिचिन्हे विक्रीसाठी उपलब्ध होती. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले असलेले हे प्रदर्शन प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत 200 हून अधिक अभ्यागतांनी पाहिले.
शतकाहून अधिक जुना रेल्वे प्रवासनेरळ-माथेरान नॅरो गेज रेल्वे मार्गाच्या बांधकामास 1904 मध्ये सुरुवात होऊन 1907 मध्ये तो वाहतुकीस खुला झाला. डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गावर मध्य रेल्वेकडून रेल्वे सेवा चालवली जाते. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मार्ग बंद ठेवला जात असला, तरी अमन लॉज-माथेरानदरम्यान 2012 पासून शटल सेवा सुरू आहे. सेवा, प्रवासी आणि उत्पन्न सध्या नेरळ- माथेरान- नेरळदरम्यान दररोज चार गाड्या, तर अमन लॉज- माथेरान- अमन लॉजदरम्यान एकूण 16 सेवा चालवल्या जातात.
नवीन डबे, नवा अनुभव
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने विंटेज रंगसंगती, लाकडी फिनिशिंग, सुधारित आसनव्यवस्था आणि प्रथम श्रेणीतील अतिरिक्त सुविधांसह नव्याने पुनर्रचित डबे सेवेत दाखल केले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातून जाणारा हा टॉय ट्रेन प्रवास केवळ पर्यटनाचा भाग न राहता थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देणारा ठरत आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्यास मदत होणार आहे.
प्रदर्शनातील खास आकर्षण
स्टीम लोको 794बी- दार्जिलिंग हिमालयन रेल्वे बोगी- माथेरान लाइट रेल्वेचे मूळ डबे- बार्शी लाइट इंजिनचे कार्यरत मॉडेल.रेल्वेचा जिवंत इतिहास- जुने बॅज, हातघंट्या, सिग्नल दिवे- लाकडी रोख पेटी, मोजमाप काटे- काचेचे निगेटिव्ह आणि वारसा साहित्य.सध्याची रेल्वे सेवा- नेरळ-माथेरान : दररोज 4 गाड्या- अमन लॉज-माथेरान : 16 सेवा- सुट्टीच्या दिवशी विशेष गाड्या.- प्रवासी आणि उत्पन्न (नोव्हेंबर 2025)- प्रवासी : 38,164- उत्पन्न : 29.18 लाख.







