पर्यटनावर यंदाही बंदीचे सावट

कर्जतमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात, स्थानिकांमध्ये नाराजी
। नेरळ । वार्ताहर ।
निसर्ग सानिध्यात असलेला प्रदूषणमुक्त तालुका म्हणून मिरवणार्‍या कर्जत तालुक्यात यावर्षीही शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे. पावसाळ्यात सुरू होणारे धबधबे व प्राचीन लेण्यांमुळे कर्जतचे सौंदर्य पाहण्यासाठी मुंबई, पुणे, कल्याण, ठाणे आदी भागातून पर्यटक येत असतात. परंतु मागील दोन वर्षे पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे आणि लॉकडाऊनमुळे कर्जतच्या पर्यटनावर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. परिणामी पर्यटन व्यवसाय धोक्यात आला असून छोट्या मोठ्या दुकानदारांचे अतोनात नुकसान होत आहे.

कर्जत तालुक्यात औद्योगिकरण नसल्याने रोजगाराची खुप मोठी समस्या आहे. पण कर्जत तालुक्याला निसर्ग सौंदर्य लाभलेले आहे. त्या सौंदर्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण व कर्जत मधील लेण्या आणि धबधब्यांवर प्रशासनाने 144 कलम लावून 4 वर्षांपासून बंद केले आहेत. पावसाळ्यात ट्रेकिंग व पर्यटनाला पर्यटक मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये येतात. कर्जत तालुक्यात आषाणे, बेकरे, वदप, नेरळ जुमापट्टी, सोलनपाडा, कोंढाणा लेणी, माथेरान असे अनेक धबधबे व लेणी पर्यटनस्थळे आहेत.

या पर्यटन स्थळावर अनेक छोटे-मोठे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, ग्रामीण भागात घरगुती जेवण देणारे लोक, खानावळ, वडापाव, भजी विक्रेते, मक्का विकणारे, चहा, कॉफी विकणारे, सँडविचवाले, पानटपरी असे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक अवलंबून आहेत. रिक्षा वाले, माथेरानचे टॅक्सीवाले, घोडेवाले, हॉटेल व्यावसायिकांना दूध, भाजी, किराणा पोहचवणारे, यांसारखे असंख्य व्यावसायिक एकमेकावर अवलंबून आहेत. त्यात कोरोनामुळे अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे शासनाने पर्यटनावरील बंदी उठवावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

प्रशासनाने यावर्षीही कर्जतच्या पर्यटनावर बंदी घातल्याने स्थानकांमध्ये नाराजी पसरली आहे. 144 कलम लागू करण्याऐवजी शासनाने यावर योग्य उपाययोजना करून व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा विचार करावा. पर्यटन वाढीसाठी स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना सोबत घेऊन येणार्‍या पर्यटकाकडून योग्य कर घेऊन, उपाययोजना कराव्यात. यातून स्थानिकांना रोजगार निर्माण होईल. यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल.

– सागर शेळके, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कर्जत.


Exit mobile version