खोल्यांच्या डागडूजीचे काम सुरू
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथे जून महिना अखेरपर्यंत पर्यटकांची रेलचेल असल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पावसाळी दिवसात पर्यटन व्यवसायाला मंदी येत असल्याने येथील व्यावसायिकांनी आता खोल्यांची दुरूस्ती व डागडुजी कामाला सुरुवात केली आहे. येणाऱ्या हंगामाच्या प्रतिक्षेत आता पर्यटन व्यावसायिक सज्ज होत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावरील अत्याधुनिक पद्धतीने झालेल्या सुशोभीकरणामुळे पर्यटन वाढीला अधिक चालना मिळाली आहे. टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेतून जे. जे. स्कूल ऑफ आर्टने चारचाकी, दुचाकी वाहनांच्या टाकाऊ स्पेअर पार्टसपासून साकारलेल्या खेकडा व कोळंबीची प्रतिकृती, मच्छीमार व्यावसायिकांच्या शिल्पा बरोबर ओपन जीम, सेल्फी पॉइंट, पॅव्हेलियन, आयता कृती खुले प्रेक्षागृह पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. डिसेंबर महिना दरम्यान श्रीवर्धन पर्यटन संस्थेकडून दोन ते तीन दिवसीय बीच फेस्टिवल करण्याचे नियोजन आहे. पर्यटकांना कोकणातील खाद्यपदार्थांची लज्जत घेता येईल व येथील कलाकारांना त्यांचे गुण प्रदर्शन दाखवता यावेत याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. असे संस्थेकडून सांगण्यात आले.
164 महिला बचत गटांच्या हाताला काम
श्रीवर्धन शहरात एकूण 164 महिला बचत गट कार्यरत आहेत. ग्रुप ट्रीप आल्यास भोजन, नाश्ता, चहाची ऑर्डर पर्यटन व्यवसायीक हे महिला बचत गटांना देतात. या हंगामात पर्यटक संख्या चांगली असल्याने महिला बचत गटांच्या हाताला काम मिळाले.
या वेळचा हंगाम समाधानकारक गेला. दिवाळी दरम्यान पर्यटक येण्यास सुरुवात होईल. त्या अगोदर खोल्यांची रंगरंगोटी व परिसर सुशोभित करणे तसेच पर्यटकांना अधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असेल.
महेंद्र भोसले
पर्यटन व्यवसायिक
श्रीवर्धन







