परतीच्या पावसामुळे पर्यटनाला बहर

। पाली । वार्ताहर ।

मागील काही दिवसांपूर्वी काही प्रमाणात पावसाने दडी मारल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मात्र, मागच्या आठवड्याभरात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाळी पर्यटन बहरले आहे. धबधबे पुन्हा कोसळू लागले आहेत. शिवाय ट्रेकिंग देखील जोरात आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिकांना उभारी मिळाली आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे व धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले आहे. कुंडलिका, अंबा, उल्हास, सावित्री, पाताळगंगा व गाढी आदी नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. डोंगरावरून खळखळत वाहत येणार्‍या जलधारांना जोर आला आहे. आणि हे सर्व पर्यटकांना आकर्षित करत आहेत. शिवाय सुधागड, सरसगड, रायगड, मानगड, अवचितगड, मृगगड आदी गडकिल्ले व डोंगरांवर ट्रेकिंग देखील होत आहे. शनिवार दि. 19 व रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी पर्यटक व ट्रेकरने या ठिकाणी गर्दी केली होती. पाऊस असाच राहिल्यास पुढील काही दिवसांत अजूनही ट्रेकर व पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version