वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटकांची मांदियाळी
| माथेरान | वार्ताहर |
थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानमध्ये पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने दिवाळीनंतर या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी पाहावयास मिळाली. घोडा, हातरिक्षा, शटल सेवा, ई-रिक्षापाठोपाठ आता नेरळ-माथेरान मिनिट्रेनही सुरू झाली आहे. सध्या ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येत असल्या तरी लवकरच त्या पर्यटकांच्या सेवत दाखल होण्याची शक्यता आहे.
माथेरानला आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. तीन वर्षात झालेल्या कामांमुळे माथेरानचा कायापालट झाला आहे. येथे मातीची धूप थांबविण्यासाठी गॅबियन वॉल, क्ले-पेव्हर आणि जांभा दगडाच्या रस्त्यांमुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना माथेरानमध्ये येणे शक्य झाले आहे. दस्तुरी येथे आल्यानंतर माथेरान शहरात आत येण्यासाठी घोडा आणि हातरिक्षांचा पर्याय प्रामुख्याने स्वीकारावा लागतो. शासकीय दराने भाडे आकारून पर्यटकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. याबाबत अचूक माहिती दस्तुरी येथे माथेरानच्या वेबसाईट कोडला स्कॅन करून मिळवता येते. येथे नगरपालिकेकडून फ्री वायफाय सेवाही उपलब्ध करून दिली आहे. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने माथेरानसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून 123 कोटीचा निधी मिळविला. आणि या निधीतून एमएमआरडीएमार्फत घाटरस्ता आणि माथेरान प्रवेशद्वारापासून पुढे महात्मा गांधी रस्त्यासाठी कामे सुरू झाली. आता ही कामे पूर्ण झाल्याने येथे चार महत्त्वाच्या पॉइंटला जाणारे रस्ते चकाचक झाले आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडून माथेरानच्या अंतर्गत रस्त्यांसाठी 43 कोटींहून अधिक निधी दिला. त्यामुळे तीन वर्षांत अंतर्गत रस्ते पण चकाचक झाले आहेत. माथेरानला येण्यासाठी आत्ता वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वप्रथम नेरळ-माथेरान घाट रस्त्याने आपण आपल्या खासगी वाहनाने माथेरानला येऊ शकता. अनेक पर्यटक स्वतःच्या खासगी वाहनाचा पर्याय निवडतात. वाहनतळात 500 गाड्यांच्या पार्किंगचे नियोजन वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून योग्य प्रकारे करण्यात आले आहे. यानंतर आबालवृद्धांच्या आवडीची नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवादेखील येथे सुरू झाली आहे. ही सेवा मागील तीन वर्षांपासून बंद होती. पण, ती आत्ता सुरळीत सुरू झाली असून, दररोज दोन फेर्या अप आणि डाऊन अशी धावते.
तिसरा पर्याय म्हणजे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्जत आगारामधून मिनीबसच्या दररोज पाच फेन्या कर्जत-माथेरान तर पाच फेर्या माथेरान-कर्जत मार्गावर धावतात. या मिनीबसच्या वेळापत्रकाबद्दल माहिती असल्यास मुंबई, पुण्याहून येथे येणार्या पर्यटकांसाठी प्रवास सोयीचा होऊ शकतो. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे, मिनीट्रेन शटल सेवा माथेरानमधील दस्तुरी नाका येथे उतरल्यानंतर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज स्थानक आहे. तिथून अमन लॉज ते माथेरान या दोन किलोमीटरसाठी मध्य रेल्वेकडून शटल सेवा नियमित सुरू असून, आठ फेन्या अप आणि डाऊन मार्गावर दररोज सुरू आहेत. ऑक्टोबरपासून ऐन हंगामात पर्यटकांसाठी मिनिट्रेन सुरू झाल्याने सर्व फेर्या अगदी हाऊसफुल्ल धावत आहेत. तसेच आत्ता आणखीन मुख्य वाहतुकीचा पर्याय म्हणजे ई-रिक्षा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत ई-रिक्षा सुरू करण्यासाठी माथेरान नगरपरिषद प्रयत्नशील असून, दस्तुरी ते माथेरानदरम्यान ई-रिक्षाने प्रवास करता येणार आहे. या ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत येथील शालेय विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक डोळे लावून बसले आहेत.