माथेरान शून्य कचरा डेपोचे पर्यटकांना आकर्षण

| नेरळ । वार्ताहर ।

माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून प्रदूषणमुक्त शहर म्हणून माथेरानकडे पाहिले जात होते. आता तर स्वच्छतेमध्ये नगर परिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना 2020 मध्ये माथेरान हे डम्पिंग मुक्त शहर म्हणून घोषित झाले आहे. 50 वर्षाचा कचरा तेथून हटविण्यात आल्यानंतर माथेरान शून्य कचरा डेपो असलेले शहर बनले असून, त्या शून्य कचरा डेपोची माहिती घेण्यासाठी अभ्यासक माथेरानला भेटी देत आहेत. त्याचवेळी आलेले पर्यटक देखील खास भेट देत असतात. त्यामुळे पर्यटन स्थळांच्या यादीत शून्य कचरा डेपो हे आणखी एक पर्यटन स्थळ बनले आहे.

माथेरानला मोटर वाहनांना बंदी असल्यामुळे येथे सर्व कामे ही मनुष्यबळावर केली जातात. यामध्ये माथेरानच्या स्वच्छता ही मनुष्यबळावर केली जाते. संपूर्ण शहरातील कचरा एकत्र करून हातगाडी मार्फत डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जायचा. त्याच वेळेस नगरपरिषदेतील तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी डम्पिंग मुक्त माथेरान करण्याच्या हालचाली केल्या आणि त्यातून ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लोकांना याची सवय लागावी म्हणून सतत जनजागृती केली. डम्पिंग ग्राउंडवर पडलेले प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, इतर कचरा याचे वेगवेगळ्या ठिकाणी वर्गीकरण केले आणि येथील कचरा उचलून मिनीट्रेनमधून माथेरान बाहेर नेला. त्यामुळे डम्पिंग हा कचरामुक्त झाला.

कचरा उचलून झाल्यावर डम्पिंग ग्राउंडमध्ये औषधी झाडे लावून त्या परिसरात पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळ बनविण्यास हर्बल गार्डन चा दर्जा देण्याचा प्रयत्न पालिकेने सुरु केला आहे. परंतु पर्यटन स्थळांच्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड हे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. त्या भागाचा अभ्यास करण्यासाठी देशभरातून अभ्यासक येत असतात. त्यावेळी ते अभ्यासक यांना माथेरान मध्ये पर्यटन देखील घडते. तर शिक्षण घेणारे पर्यटक देखील माथेरान मध्ये आल्यावर डम्पिंग ग्राउंडला भेटी देत असतात. तर माथेरानमध्ये कचरा मुक्तीचा ध्यास घेऊन काम केल्याबद्दल तात्कालिक मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या नावाने मार्ग देखील बनविण्यात आला आहे. असे एखाद्या रस्त्याला एखाद्या अधिकार्‍याचे नाव देण्यात उदाहरण अलौकिक असेच आहे. त्यात या शून्य कचरा डेपो मध्ये येऊन अभ्यास करणारे असंख्य अभ्यासक माथेरानमध्ये काहीस येत आहेत.

Exit mobile version