मर्कटलीला पर्यटकांचे आकर्षण

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानमध्ये विविध वस्तुंच्या आकर्षणासोबतच इथली माकडेदेखील पर्यटकांचे आकर्षण आहेत. माथेरानमध्ये कुठेही गेल्यावर माकडांच्या टोळ्या दिसत असतात. येथील प्रत्येक पॉईंवर ही माकडे आपल्या समुदायाने जंगलात वास्तव्य करून राहतात. तर, गावातसुध्दा यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुख्य प्रवेशद्वार दस्तुरीपासून ते वन ट्री हिल पॉईंट या शेवटच्या टोकापर्यंत जिकडे तिकडे माकडे दिसत असतात. मागील काही वर्षांपासून हॉटेलमधील किचन वेस्ट नगरपरिषदेच्या बायोगॅस प्रकल्पासाठी वापरले जात असल्याने त्यांच्या खाण्याची गैरसोय झाली आहे. यामुळे ही माकडे भररस्त्यात पर्यटकांच्या हातातील खाद्य पदार्थ किंवा शीतपेय बाटली हिसकावून फस्त करतात. शक्यतो ही माकडे कुणाला इजा करत नाहीत. परंतु, त्यांना दगड मारल्यास संतापून अंगावर गुरगुरतात. पावसाळ्यात तर गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरून जो काही खाद्यपदार्थ हाताला मिळेल ते घेऊन पळ काढतात. माथेरानचे हे एकमेव आकर्षण असून खाण्याची आबाळ झाल्यामुळे केवळ भुकेपोटी पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेत असतात.

Exit mobile version