। नेरळ । प्रतिनिधी ।
मागील काही दिवसांपासून माथेरानमधील घनदाट जंगलात असलेल्या आठ ते दहा माकडांना वेगळाच आजार जडला असल्याचे दिसून आले आहे. माकडाच्या पाठीमागील बाजूस त्याच्या शरीरातील काही इंद्रियांची मोठी वाढ झाली असल्याने ती इंद्रिये शरीराच्या बाहेर जमिनीकडे झुकू लागली असल्याचे आढळून आले आहे. शहरात आणि जंगलात अशी माकडे दिसून येत असून अश्वपालक असलेले पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली आहे. वन विभागाचे वनपाल राजवर्धन आडे यांनी जंगलात फिरून अशा माकडांची पाहणी केली आहे. तसेच, असा आजार जडलेल्या माकडांची माहिती वन अधिकारी यांनी पशू संवर्धन अधिकारी डॉ. चव्हाण यांना दिली आहे.
येथील माकडांचे खाणे हे प्रामुख्याने जंगलातील झाडांची फळे असते. मात्र, माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेले पर्यटक सोबत आणलेले खाद्य पदार्थ येथील माकडांना खाण्यासाठी टाकत असतात. काही माकडे तर स्वतःहून पर्यटकांच्या हातातून शीतपेय पासून खाण्याचे पदार्थ हिसकावून नेत असल्याने माकडांच्या खाण्यात पुर्णपणे बदल झालेला आहे. यामुळे माकडांना विविध प्रकारचे आजार जडू शकतात, असा अभ्यास पर्यावरणप्रेमी राजेश कोकले यांनी केला आहे. तसेच, बिस्किटे खाऊन माकडांच्या अंगावरील केस निघून जात असल्याचा निष्कर्ष कोकळे यांनी काढला असून याबाबतचा अभ्यास करण्याची सूचना पशुसंवर्धन अधिकार्यांना केली आहे.