पर्यटन कार टॅक्सीचा होणार लिलाव

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई मोटार वाहन अधिनियमांतर्गत मोटार वाहन कर न भरलेल्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई यांच्या आवारात जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांचा जाहीर लिलाव 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई येथे होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई यांनी दिली आहे.

जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येत आहे. थकीतदारांना लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी राहील. लिलाव होणार्‍या वाहनांची यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई येथे कार्यालयाच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषि उत्पन्न बाजार समिती धान्य मार्केट, सेक्टर नं.19 ब टी ब्लॉक, गेट क्र.7, नवी मुंबई या ठिकाणी करता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर ऑनलाईन प्रसिध्द करण्यात येतील. तरी सर्व इच्छुक व्यक्तींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई दूरध्वनी क्र.022-27830701 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version