अलिबागमधील समुद्रकिनार्यावरील घटना
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यास आलेला पुण्यातील पर्यटक गुरुवारी दुपारी समुद्रात बेपत्ता झाला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो मृतावस्थेत सापडला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अविनाश कृष्णा शिंदे(28) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. हा मुळचा औरंगाबाद येथील रहिवासी असून सध्या पुणे येथील आळंदी येथे राहणारा आहे. पुणे येथील एका कंपनीमधील मित्रांसमवेत तो अलिबागमध्ये फिरण्यास आला होता. दुपारी अलिबाग समुद्रकिनारी फिरत होते. त्यातील अविनाश शिंदे हा पाण्यात पोहण्यास गेला. मात्र भरतीच्या पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो पाण्यातच बेपत्ता झाला. तेथील स्थानिकांच्या मदतीने अलिबाग पोलीसांमार्फत शोध कार्य सुरु करण्यात आले. पर्यटक पाण्यात बुडाल्याने खळबळ उडाली होती. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या मागील बाजूस तो मृतावस्थेत सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले असून अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.