पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांतून स्थानिकांना रोजगार होणार उपलब्ध
जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्यास पर्यटक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी यांची कायम पसंती असते. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, अभ्यास दौरे या दोन्ही पर्यटनस्थळी आयोजित होत असतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांविषयीची माहिती व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, अशी पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांची संकल्पना होती. त्यानुसार भारत सरकारचा ऑनलाईन “पर्यटन सुलभ मार्गदर्शक” हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या प्रमाणित करून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील फणसाड व कर्नाळा अभयारण्य येथील एकूण 31 आदिवासी स्थानिक युवक-युवतींना “टुरिस्ट गाईड प्रशिक्षण” देण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या रु.3 लक्ष 66 हजार 500 इतक्या खर्चास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
कर्नाळा व फणसाड अभयारण्यात पायाभूत सोयी-सुविधांमध्ये गाईड नेमण्याबाबत निर्देश पर्यटन विभागास दिले होते. त्यानुषंगाने राज्याच्या पर्यटन विभागाकडून स्थानिक युवक-युवतींना मार्गदर्शक होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पर्यटन व वन विभागामार्फत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीस शासनाने मंजूरी दिली आहे. यामुळे स्थानिकांना, तरुणांना मार्गदर्शकाच्या व्यवसायातून रोजगार मिळणार असून पर्यटकांनाही सुविधा उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यास मिळालेले वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्य, अद्वितीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अधिकाधिक आहे. फणसाड व कर्नाळा अभयारण्य इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला एक समृध्द व आल्हाददायक अनुभव देण्याचा पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. कु.आदिती तटकरे यांचा प्रयत्न आहे. भटकंती, प्रवास हा फक्त एक छंद म्हणून न जोपासता त्याला एक शैक्षणिक आणि व्यावसायिक जोड देण्याचा विचार करणाऱ्या राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी “पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण” ही संकल्पना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पर्यटनाची आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित टुरिस्ट गाईड तयार करण्यात येणार आहे.
कर्नाळा व फणसाड अभयारण्य येथील वनक्षेत्र परिसरातील वनसंवर्धन पर्यटनस्थळे अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने आदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इथे राहण्याच्या सोयी-सुविधा देखील उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागास दिल्या आहेत.