खड्ड्यात पाय पडून पर्यटक जखमी

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरण पूरक रस्ते बनविण्यात आले असून शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यातील काही क्ले पेव्हर ब्लॉक हे निघून गेले आहेत. त्याच एका पेव्हर ब्लॉकच्या खड्ड्यात एका पर्यटक महिलेचा पाय रुतला आणि त्या जखमी झाल्या. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेने मागील काही दिवसांपूर्वी हेच खड्ड भरले होते काय, असा प्रश्‍न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी केला आहे.

माथेरान मध्ये पर्यटकांची शनिवार रविवार व इतर दिवशी पावसाळी हंगामाची गर्दी होत असते. शहरात महात्मा गांधी रस्ता हा क्ले पेव्हर ब्लॉकने बनविले असून असे पर्यावरण पूरक रस्ते शहरात अनेक ठिकाणी बनविले आहेत. त्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील टपाल पेटी ते माथेरान रेल्वे स्टेशन या भागातील रस्त्यावर बसवलेले क्ले पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. त्यातील एका खड्ड्यात रविवारी (दि.14) एका महिला पर्यटकाचा पाय अडकून त्यांचा पाय मुरगळला. त्यानंतर त्या महिला पर्यटक विव्हळत बसल्या असल्याचे दिसून आले. यानंतर ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव यांनी पालिकेच्या ठिसाळ कारभाराबाबत प्रश्‍न उभे केलेे. माथेरान पालिकेने मागील आठवड्यात हेच खड्डे भरले होते का, असा सवाल या निमित्ताने करण्यात आला आहे.

Exit mobile version