पर्यटन स्थळी पर्यटकांची मांदियाळी

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सध्या कोरोनाचे सावट धुसर झाले आहे. त्यात अनेक नियम शिथिल केले गेले आहेत. परिणामी विकेंड सुट्ट्यांमध्ये येथील सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल होत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक व उद्योजक सुखावले आहेत. यंदा राहण्या-खाण्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. पर्यटनस्थळे हाऊसफुल झाल्याने स्थानिकांच्या रोजगाराला चालना मिळाली आहे. तसेच लहानमोठे व्यावसायिक यांचा धंदाही तेजीत सुरू आहे. पुणे-मुंबईसह महाराष्ट्र व राज्याबाहेरील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत. सर्व ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, राईड्सवाले यांची सध्या चलती आहे. अलिबाग- नागाव, वरसोली, मुरुड-काशिद, श्रीवर्धन-दिवेआगर, हरिहरेश्‍वर येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे विविध राईडचा आनंदही ते घेत आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र परिचित आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी अजून काही उन्हाची काहिली कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या कडाक्यात गारवा घेण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची रेलचेल पहायला मिळत आहे. आठवड्या भरापासूनच येथील काही हॉटेल व लॉज बुक झाले असले तरी येणार्‍या पर्यटकांची कोणतीच गैरसोय होणार नाही याची काळजी येथील व्यावसायिक घेत आहेत. अष्टविनायकांपैकी दोन गणपती हे रायगडमध्ये आहेत. ते म्हणजे खालापुर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्‍वर, सध्या येथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. समुद्रातील मुरुड जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ला व उरण जवळील घारापुरी/अजंठा लेणी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. येथील नगरपालिका, नगरपरिषदा, व ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात पर्यटक करामुळे भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version