माथेरानमध्ये पर्यटन हंगामाला सुरुवात

हॉटेल, लॉजिंग, बाजारपेठा, मिनीट्रेन पर्यटकांनी फुलली

| नेरळ | वार्ताहर |

दिवाळी सुट्टीसाठी माथेरानमधील गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. दिवाळी सणामधील लक्ष्मी पूजन हा महत्त्वाचा सण रविवारी झाल्याने सोमवारपासून माथेरान पर्यटकांनी भरून गेले आहे. पर्यटन हंगामातील दिवाळी पर्यटन हंगामाला सर्वाधिक महत्त्व असते. त्यानिमीत्ताने हॉटेल्स देखील सजली असून पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सुरु झाल्याने पर्यटक गर्दी करू लागले आहेत. दरवर्षी पावसाळा संपला की, विजयादशमीच्या सणानंतर येथील व्यावसायिक आपापल्या हॉटेल्स, लॉजिंग तसेच दुकानांची डागजुजी, रंगरंगोटी करुन घेतात. नव्या नवलाईने माथेरानमधील हॉटेल पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. त्यात दिव्यांचा सण असल्याने माथेरानमध्ये रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवाळी सण सुरू झाल्यावर पर्यटकांची खऱ्या अर्थाने मोठी गर्दी रविवारच्या लक्ष्मी पूजनानंतर माथेरानमध्ये दिसू लागली आहे. आज पहिल्याच दिवशी माथेरानमधील पिसरनाथ बाजार, कोतवाल बाजार आणि महात्मा गांधी रस्त्यावरील मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.

माथेरानमध्ये खासगी वाहनाने येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यांच्या सोयीसाठी माथेरान पालिकेने दस्तूरी येथील वन विभागाचे वाहनतळ सुसुज्ज केले आहे. या ठिकाणी 500 हून अधिक वाहने एकावेळी पार्किंग करण्याची व्यवस्था केली आहे. त्याचवेळी नेरळ-माथेरान घाटात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी माथेरान पोलिस आणि नेरळ पोलिस यांच्याकडून देखील खबरदारी म्हणून वाहतूक पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नेरळ-माथेरान प्रवासी टॅक्सी सेवा देखील 24 तास सेवा देत आहेत. रात्री-अपरात्री देखील पर्यटकांच्या सेवेसाठी नेरळ आणि माथेरान दस्तूरी येथील टॅक्सी संघटनेचे कार्यालय सुरू राहणार आहे, अशी माहिती अध्यक्ष नरेश कराळे यांनी दिली. माथेरानमधील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने हॉटेल व्यवसायिक तसेच लॉजींग व्यवसायिक समाधानी आहेत, असे लॉजीग बोर्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप जाधव यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आभार मानले आहेत.

नवीन पर्यटन हंगामासाठी माथेरान सजले असून सर्व प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी देखील दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. माथेरानमध्ये पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन हॉटेल व्यवस्थापनाने आयोजित केले आहेत. माथेरानमधील रस्त्यांवर कुठेही कचरा दिसू नये यासाठी पालिकेचे कामगार हे रात्रंदिवस तैनात करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या दिमतीसाठी शेकडो घोडे सज्ज असून रात्री बारा वाजेपर्यंत आणि पुन्हा पहाटे सूर्योदय दर्शनाची सोय त्यांनी पर्यटकांसाठी देऊ केली आहे, अशी माहिती स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम आणि मुलावासी अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी दिली.

माथेरानमध्ये आलेल्या प्रत्येक पर्यटकाला मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर मिनी ट्रेन सुरु केली आहे. याच मार्गावर माथेरान अमन लॉज स्थानक या दरम्यान शटल सेवा सुरू असून पर्यटकांची गर्दी मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी दिसून येत आहे.

Exit mobile version