रायगडच्या किनार्‍यांना पुन्हा पर्यटकांची भरती

व्यवसायही झाले तेजीत
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
सलग आलेल्या सरकारी सुट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे गर्दीने फुलली आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्र किनार्‍यांना पर्यटकांची अधिक पसंती आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने समुद्रकिनारे, गडकिल्ले, धार्मिक स्थळे पर्यटकांसह स्थानिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांनीही पर्यटन स्थळांवर आनंद साजरा करण्यास प्राधान्य दिले. मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतूनही जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. अलिबागसह, नागाव, आक्षी, वरसोली, किहिम, मांडवा, आवास, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिघी अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली. घोडागाडी, एटीव्ही बाईकवर स्वार होऊन समुद्रकिनार्‍यांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. समुद्रकिनार्‍यावरील स्टॉलवर वडापाव, भजी, पॅटीस असे वेगवेगळे प्रकारचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या लहान-मोठ्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटी देतो. विशेषकरून मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात जातो. या वेळेला अलिबाग समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटला आहे. या ठिकाणी पालिकेने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. मात्र किनारी ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. हे योग्य नाही. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
आदेश पालकर, पर्यटक

Exit mobile version