पर्यटकांचा प्रवास कधी सुकर होणार?
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड-राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याजवळ प्रवाशांना किल्ल्यात चढ-उतार करण्यासाठी जेट्टीचं काम सुरू केले होते. हे काम बंद असल्याने पर्यटकांनी नाराजी दर्शवली असून, ही जेट्टीचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल विचारण्यात येत आहे.
जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी शिडाच्या बोटीतून पर्यटकांना ने-आण केली जाते. किल्ल्याजवळ पोहोचतो तेव्हा प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने बोटीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत होती. काही पर्यटक तर उतरताना गंभीर जखमी झाले आहेत. याची दखल घेत शासनाने सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेट्टी बनवण्याची 93 कोटी 56 लाख रुपये निधीची मंजुरी दिली. हे काम किल्ल्याचा मुख्य प्रवेश पश्चिमेला असल्याने पुरातत्व विभागाने व तज्ज्ञांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकार्यांसह पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून 500 पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेट्टी बनविण्यास सुरुवात केली आहे. समुद्राच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी 250 मीटर लांबीची लाटरोधक भिंतीही उभारण्यात येणार आहे. सध्या हे काम बंद असल्याने नाराजी दर्शवली आहे. लवकरात लवकर जेट्टीचं काम सुरू करा, अशी मागणी सर्वच स्तरावर होत आहे.
जेट्टी बनवण्याचं काम पावसामुळे बंद केले होते. दिवाळीच्या आधी कामाला सुरुवात होईल.
– सतीश देशमुख, बंदर निरीक्षक, राजपुरी
पर्यटकांसाठी जंजिरा किल्ल्याजवळ पर्यटकांसाठी प्रवासी जेट्टीच्या कामाला डिसेंबर 2023 या महिन्यात सुरुवात केली होती. हे काम 80 टक्के पूर्ण झालं आहे. ठेकेदराला दोन वर्षांचा कालावधी दिला असला तरी ही प्रवासी जेट्टी फेब्रुवारी किंवा मार्च 2024 यादरम्यान पर्यटकांसाठी खुली होईल.
– दीपक पवार, अभियंता, मेरिटाईम बोर्ड