| कल्याण | प्रतिनिधी |
टिटवाळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षा चालकाला भाडे देण्यासाठी प्रवाशाने 50 रुपयांची नोट दिली. मात्र नोट फाटलेली असल्याने रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या भयंकर मारहाणीत प्रवासी अंशूमन शाही हे खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णलयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. कल्याण जवळील टिटवाळा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी रिक्षा चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रिक्षा चालक राजा भोईर याला अटक केली आहे.
कल्याण नजीक टिटवाळा परिसरात असलेल्या हरी ओम व्हॅली इमारत क्रमांक सातमध्ये अंशूमन शाही हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांना एक मुलगी आणि पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. गुरुवारी (दि.10) रात्री ते रिक्षातून घराजवळ आले. या वेळी त्यांनी प्रवासी भाडे देण्याकरीता 50 रुपयांची नोट काढली. या फाटक्या नोटेवरून रिक्षा चालकाने प्रवाशाला प्रश्न केला. 50 रुपयांची नोट फाटलेली असल्याने रिक्षा चालकाने त्यांच्याशी वाद घातला. या वादात रिक्षा चालक आणि अंशूमन यांच्या हाणामारी झाली. या हाणामारीत अंशूमन हे बेशुद्ध होऊन खाली कोसळले. उपचारासाठी रुग्णलयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश कदम यांनी अंशूमन यांचा भांडणानंतर हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती दिली. प्रवाशाच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रिक्षा चालक राजा भोईर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.