ओहोटीच्या वेळी बोटीतून उतरताना अपघाताचा धोका
। मुरुड । वार्ताहर ।
ओहोटीमुळे फेरीबोटीतून उतरताना कसरत करावी लागत असल्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांचा खोरा बंदरात हिरमोड होत आहे. यामुळे पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होत असल्याने खोरा बंदरातील जेट्टी वाढविण्याची गरज पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही वर्षांपूर्वी मुरुडला येणार्या पर्यटकांसाठी किल्ल्यामध्ये प्रवेशासाठी एकमेव राजपुरी जेट्टी उपलब्ध होती. पर्यटकांची वाढती लोकसंख्या पाहता राजपुरी येथे वाहतूक व्यवस्था कमी पडत असे. त्यामुळे अनेक पर्यटक किल्ला न पाहताच परत जात होते. त्याला पर्याय म्हणून मुरुड खोरा बंदर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात आले.
परंतु, ओहोटीच्यावेळी पाणी कमी होत असल्याने फेरी बोटीतून उतरताना पर्यटकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अशा वेळी एखाद्या पर्यटकाचा पाय घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. भविष्यात असे न घडण्यासाठी बंदर विकास खात्याने लवकरात लवकर जेट्टीची व्यवस्था करावी व येथील पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हातभार लावावा अशी स्थानिक व पर्यटकांची मागणी आहे.