माथेरानमध्ये गटारीनिमित्त पर्यटकांची तोबा गर्दी

घाटरस्त्यात वाहने पार्क केल्याने घाटात वाहतूक कोंडी

| माथेरान | वार्ताहर |

गटारीनिमित्त रविवारी पर्यटकांनी माथेरानला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे येथील पार्किंग हाऊसफुल्ल झाली. परिणामी, पर्यटकांनी आपल्या गाड्या या घाटरस्त्यात पार्क करून ठेवल्या, त्यामुळे घाटरस्त्यात वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला. दरम्यान, वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही पर्यटकांनी अर्ध्यातून परतीचा रस्ता पकडला, तर काहींनी तेथून चालतच माथेरान गाठणे पसंत केले.


शनिवारीच मोठ्या प्रमाणात पर्यटकमाथेरानमध्ये दाखल झाले होते. कर्जत तालुक्यात प्रशासनाकडून 144 कलम लागू असतानादेखील माथेरान वॉटरपाईप धबधबा येथे पर्यटकांनी गर्दी केली होती. एकीकडे धबधब्यावर पोलीस बंदोबस्त असल्याने प्रेमीयुगुलांसह मोठ्या प्रमाणात तरुण माथेरानकडे जाण्यासाठी वळाले होते. माथेरान येथे पार्किंगसाठी मोठी जागा आहे. यात 500 चारचाकी व 400 दुचाकी सामावतील अशी जागा असताना देखील पार्किंग फुल्ल झाल्याने पर्यटकांनी आपली वाहने ही घाटरस्त्याच्या दुतर्फा पार्क करून ठेवली. काही पर्यटकांची वाहने दस्तुरीपासून कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत म्हणजे 3 कि.मी. वाहने पार्क केलेली होती. त्यात काही आदल्या दिवशी मुक्कामाला आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याने या विकेंडच्या पर्यटकांची घाटरस्त्यात तोबा गर्दी झाली. तर घाटरस्तात वाहनांच्या गर्दीने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी साधारण 1 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या काही पर्यटकांनी अर्ध्यातून परतीचा रस्ता पकडला. तर पर्यटकांमधील असलेल्या उत्साहाने त्यांनी दमछाक होत असतानाही चालत माथेरान गाठले. दरम्यान, माथेरानमध्ये विकेंडला आलेल्या पर्यटकांसाठी वाहतूक नियोजन करणे गरजेचे बनले आहे.


तीन दिवसात 22,440 पर्यटक
विकेंडला माथेरानला पसंती दिली जाते. त्यामुळे या विकेंडला माथेरानमध्ये 22 हजार 440 पर्यटक आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवारी 3 हजार 943 वयस्क तर 155 बालके, शनिवारी 10 हजार 388 वयस्क तर 466 बालके, तसेच रविवारी दुपारी 2 वाजेपर्यंत 7 हजार 124 वयस्क तर 364 बालके माथेरानला आले होते.

नगपरिषदेकडून ती माणसे पोलिसांसोबत वाहतूक व्यवस्था सांभाळत असतात. जेणेकरून पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये. मात्र, दस्तुरी येथील पार्किग फुल्ल असल्याने पर्यटकांना घाटात वाहने लावावी लागतात. परिणामी, वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे एमपी 93 या प्लॉटबद्दल माहिती घेऊन तो मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच गव्हर्नर हिल याबाबतदेखील माहिती घेणार आहोत.

वैभव गारवे, मुख्याधिकारी, माथेरान

आम्ही मालाडवरून माथेरानला विकेंडसाठी आलो होतो. मात्र याठिकाणी वाहतूक कोंडीत आम्ही साधारण 1 तास अडकून पडलो. पण आम्हाला उत्साह आहे. त्यामुळे आम्ही भले दमलो असलो तरी चालत निघालो आहोत. गाडी येईल तेव्हा येईल.

दर्शन जाधव, पर्यटक, मुंबई

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एमपी 93 हा प्लॉट पार्किंगसाठी शासनाकडे मागितला होता. हा विषय अंतिम टप्प्यात येऊन थांबला. तर दस्तुरी येथे गव्हर्नर हिल ही जागा मिळाल्यास पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने हा विषय लवकर सोडवावा, अशी आमची मागणी आहे.

प्रेरणा सावंत, माजी नगराध्यक्षा माथेरान नगरपरिषद
Exit mobile version