| संतोष पेरणे । नेरळ ।
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक गिरीस्थान माथेरान येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या आगमनासाठी पर्यटकांची मांदियाळी दिसत आहे. अर्थातच कोरोनाविषयक आरोग्यनिर्बंधांचे यशायोग्य पालन करत पर्यटकांचा मानस समाधानपूर्वक सिद्ध होण्यासाठी माथेरान प्रशासनही सज्ज झाले आहे. पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन माथेरान असल्यामुळे पर्यटकांचा ओघ नेहमी माथेरानकडे असतो. याच पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल ट्रेन सर्वांना खुली केली नसल्याने जास्त पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. येथील पार्किंगची व्यवस्था तोकडी पडत असल्याने येथील जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि त्याला लागून आलेला रविवार या दिवसांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झाले होते. यामुळे या वर्षाच्या शेवटी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये येतील असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. हा पर्यटन हंगाम येथील व्यावसायिकांचा आर्थिक स्तर उंचावणारा असतो, म्हणूनच पर्यटकांच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे.