माथेरान पर्यटकांनी फुलले; पावसाने उसंत घेताच विकेंडला गर्दी

। माथेरान । वार्ताहर ।
सतत सुरू असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतल्या त्यामुळे शनिवार व रविवारी माथेरानमध्ये पाच हजाराहुन अधिक पर्यटक दाखल झाले होते. थंड वारा, रिमझिम बरसणार्‍या धारा आणि धुक्याची चादर या सर्वांचा आनंद पर्यटकांनी घेतला.पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे जिकडेतिकडे डोंगरावरून, दरी मधून वाहणारे फेसाळलेले झरे दिसत आहेत.

मागील चार दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने विकेंडमध्ये मौजमजा करण्यासाठी येथे दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये कही खुशी कही गम पहावयास मिळाला. इतर पर्यटनस्थळे बंद असल्याने मुबई,पुणे येथील पर्यटकांची पाऊले माथेरानकडे वळली आहेत. गुजरातमध्ये देखील पावसाने धुमाकूळ घातला असला तरी पावसाळी पर्यटनासाठी गुजराती पर्यटक माथेरानला पसंती देत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे गुजराती पर्यटक भरपूर प्रमाणात दिसत आहेत. याच विकेंडला पाच हजारांहून अधिक पर्यटक येथे दाखल झाले होते. तसेच येथे सोमवार ते शुक्रवार या मधल्या दिवसात देखील वन डे पिकनिक साठी पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे

पाऊस कमी असल्यामुळे कौटुंबिक सहलीला आलेल्या पर्यटकांना फिरण्याची मजा वाटत होती. माथेरानमधील प्रसिद्ध शारलोट तलाव येथील सुरक्षित धबधब्यावर पर्यटकांची भरपूर प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. या धबधब्यावर पर्यटकांनी मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. ऊन नसल्याने ढगाळ वातावरण त्यात वारा आणि धुक्याचा संगम यामुळे वातावरण अगदी काश्मिर प्रमाणे थंडगार होते.

पाऊस जरी नसला, तरी येथील वातावरण थंड आणि आल्हाददायक होते. या वातावरणात आल्यावर मुंबईचा पूर्ण विसर पडला. पाऊस नसल्याने थोडे नाराज झालो; पण शारलोट तलावाच्या धबधब्यावर गेलो आणि भरपूर मजा घेतली.धबधब्यासाठी पूर्ण सुरक्षित असल्यामुळे येथे पर्यटन करण्यासाठी वेगळीच मजा येते.

-अक्षय कुंवर, पर्यटक, मुंबई

Exit mobile version