| माथेरान | वार्ताहर |
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई आणि पुणे परिसरातील तसेच गुजरात राज्यातील पर्यटकांनी येथे माथेरान पर्यटनस्थळाला हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरान मध्ये दाखल झाले होते. त्यामुळे माथेरानला पर्यटकांची तुडुंब गर्दी झालेली दिसत होती.
शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांबरोबरच 15 ऑगस्ट, 16 ऑगस्टला पारशी नववर्षाची सुट्टी असल्याने पर्यटकांची माथेरानला पर्यटनस्थळी गर्दी झालेली दिसत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हॉटेल्स आणि लॉज धारकदेखील आलेल्या पर्यटकांना सेवा सुविधा पुरविण्यात मग्न झालेले दिसत आहेत. हौशी पर्यटक येथे घोड्याची रपेट मारताना दिसत आहेत. तर काही तरुण मंडळी येथील शारलोट तलावाच्या धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. पावसाने येथे थोडी उसंत घेतल्याने बहुसंख्य पर्यटक हिरव्या गर्द जंगलातून वेगवेगळ्या पॉईंटची पायी सफर करताना आणि निसर्गसौंदर्य न्याहाळताना दिसत आहेत. एको पॉईंट, लुईझा पॉईंट, सिलिया पॉईंट, हनिमून पॉईंट तसेच दूरवर असलेला वन ट्री हिल पॉईंट या परिसरात सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणावर भटकंती करीत आहेत. तर येथील गारेगार वातावरणात आणि इथल्या गर्द अशा वनराईत पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद घेत आहेत.
आम्ही पावसाळ्यात माथेरान येत असतो, परंतू सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे या विकेंडला मोठी गर्दी दिसत आहे. येथील आल्हाददायक वातावरणात मन प्रसन्न होते. यावेळी पावसाने थोडी उघडीप घेतल्याने पावसात भिजण्याचा थोडा हिरमोड झाला.
सागर रुपवते, पर्यटक, मुंबई