बसस्थानक रुतले चिखलात, कचऱ्याची समस्या कायम, प्रसाधनगृहाची दुरवस्था
माणगाव वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाचे असणाऱ्या माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्यांशी सामना करीत आहेत. तसेच बसस्थानकात असलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था असून आवारात चिखल व कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवासी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बसस्थानकातील स्वच्छतेकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले.
नागरिकांची समस्या लक्षात घेता माणगाव बसस्थानकातील कॉक्रीटीकरणासाठी 16 लाख रुपये आ. भरत गोगावले यांनी पाठपुरावा करून मंजुर करुन घेतला. पण हा निधी अपुरा पडल्याने उर्वरित काम दुसऱ्या टप्यात केले जाईल असे आश्वासन आ. गोगावले यांनी दिले होते. उर्वरित बसस्थानक आवार खड्डेमुक्त करण्यासाठी आणखीन निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे होते. मात्र उर्वरित पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे बसस्थानकात खड्डे पडले असून या खड्यात चिखल आणि गाळ साचल्याने प्रवासी नागरिकांना या चिखलातूनच बसस्थानकात जाण्यायेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
शासनांनी जिल्हातील बसस्थानके सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याची घोषणा केली मात्र हा निधी माणगावात पोहोचलाच नसल्याने प्रवासी नागरिकांना खड्ड्यातील चिखल, उघडी पडलेली डबर, खडीतून पायवाट काढीत ये-जा करावी लागते. 2 नोव्हेंबर रोजी संबंधित ठेकेदारामार्फत कॉक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. हा निधी अपुरा असल्याने बसस्थानकातील समस्या प्रवाशांना अधिकच भेडसावू लागल्या. बसस्थानक आवारात पावसाळयापूर्वी पुरेसा निधी उपलब्ध करून कॉक्रीटीकरण संपूर्ण करणे गरजेचे होते. त्यामुळे कॉक्रीटीकरण झालेल्या भाग उंच व कॉक्रीटीकरण न झालेला भाग खड्ड्यात अशी स्थिती आहे. प्रवासी नागरिकांना बसस्थानकात जाने व येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बसस्थानक आवारात कचरा साठला आहे. बसस्थानकात लाद्या फुटल्या असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवासी नागरिकांची कुचंबणा होत आहे.