। श्रीवर्धन । वार्ताहर ।
डिसेंबर महिन्यातील शेवटचा शनिवार व रविवार तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी श्रीवर्धनमध्ये पर्यटकांचा अलोट सागर उसळलेला आहे. श्रीवर्धन शहरामध्ये पर्यटकांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली देखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सहलीच्या बस गाड्या श्रीवर्धन शहरामध्ये शिरल्यानंतर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे समोरासमोरून दोन मोठी वाहने पास होत नाहीत. त्यासाठी वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी श्रीवर्धन पोलिसांनी विविध प्रकारे पावले उचललेली आहेत.
नाताळच्या सुट्ट्यांचा हंगाम असल्यामुळे पर्यटकांनी श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच समुद्र किनार्यांना पसंती दिली आहे. श्रीवर्धन बरोबरच हरिहरेश्वर, दिवेआगर व आरावी या ठिकाणी देखील समुद्रकिनार्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे या ठिकाणी असणारे हॉटेल व्यवसायिक, त्याचप्रमाणे लॉजिंग बोर्डिंग व रिसॉर्टचे मालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरती प्रत्येक शनिवारी व रविवारी सायंकाळी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिक गायक यांना देखील गाण्याची संधी देण्यात येत आहे.