पर्यटन व्यावसायिक तूर्तास सुखावले
। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे |
खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवार (दि.) पासून मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद बीचवर पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पर्यटकांच्या हजेरीने किनार्याला उर्जितावस्था आली आहे, अशी माहिती काशीद येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत जंगम यांनी बोलताना दिली.
मात्र खूप मोठ्या प्रमाणांत पर्यटक नसले तरी 80 ते 100 वाहने दिसून येत आहेत. पर्यटकांमुळे काशीदबीच फुल नसला तरी आलेल्या पर्यटकांच्या हजेरीने व्यवसायिक तूर्तास सुखावले असल्याचे सांगण्यात आले. आल्या आल्या पर्यटकांनी समुद्रकिनारी धाव घेऊन आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले. मधल्या काळात बिचवरील पर्यटन खूपच रोडावले होते.मोजकेच पर्यटक डोकावून जात असल्याने पर्यटन व्यवसाय थंडावला होता. काशीद बीच हे ठिकाण म्हणजे मुरूड तालुक्यातील काशीद बीच पर्यटकांतून कमालीचे लोकप्रिय ठिकाण असून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. नवरात्रीपर्यंत बीचवर अधिकतर शुकशुकाट जाणवत होता. पर्यटक आल्याने पर्यटन व्यवसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पर्यटक सुट्टीच्या दिवशी किंवा शनिवारी येतात आणि रविवारी घरी परत जातात. मुरूड तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक आठवडाभर स्थिरावले तरच येथील पर्यटन व्यवसायाची भरभराट होऊ शकेल. यासाठी शासनाकडून उत्तम उपाययोजना निर्माण झाल्यास नावलौकिक अधिक वाढेल. दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने येतील अशी प्रतिक्रिया सूर्यकांत जंगम यांनी दिली.