पर्यटकाची चारचाकी अडकली समुद्रकिनारी

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा पर्यटकांच्या बेफिकीरपणामुळे खळबळजनक प्रकार घडला. भरतीच्या वेळी समुद्राच्या वाळूत चारचाकी घेऊन जाण्याच्या निष्काळजीपणामुळे गाडी वाळूत रुतली. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने गाडी सुखरूप बाहेर काढली. मात्र, अशा बेफिकीर वर्तनाला वाव न देता चालक यश मेहता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गव्हाणे करीत आहेत.

रेवदंडा समुद्रकिनारी अशा घटना आता वारंवार घडू लागल्या आहेत. पर्यटक निष्काळजीपणे गाड्या वाळूत उतरवतात त्यामुळे गाड्या रुतून बसतात आणि मग पोलीस व स्थानिकांना जीव धोक्यात घालून त्या बाहेर काढाव्या लागतात. किनाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर कुठेही ‌‘धोक्याची सूचना’ नाही, ना सावधानतेचे बोर्ड आहेत. पोलीस गस्त अभावानेच दिसते. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून समुद्रकिनारी अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशी जनतेची जोरदार मागणी आहे.

Exit mobile version