प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी पोलिसांनी कसली कंबर
| रायगड | प्रमोद जाधव |
सरत्या वर्षाला निरोप देत 2026 या नवीन वर्षाचे बुधवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. डिजेच्या ठेक्यावर नाचत, आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवी आशा, नवे स्वप्न घेत गुरुवारी सकाळी पर्यटक त्यांच्या परतीच्या मार्गावर निघाले. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नाक्या-नाक्यावर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. अलिबाग रोहा मार्गावरील बेलकडे-कुरुळ रस्त्यावर तसेच पोयनाड-पेझारी रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.
गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्हयाला पसंती दर्शविली. याही लाखो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले. समुद्रकिनाऱ्यांसह हॉटेल, रेस्टॉरन्ट पर्यटकांनी फुल्ल झाले होते. किनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. रात्री बाराचा ठोका झाल्यावर प्रत्येकाने हॅप्पी न्यू इअर असे बोलत नवीन वर्षाच्या शुभेच्छा अनेकांना दिल्या. रात्री बारा वाजेपर्यंत अनेकजण डिजेच्य ठेक्यावर नाचत होते. नव्या वर्षाचे स्वागत झाल्यावर पर्यटक त्यांच्या परतीच्या मार्गावर गुरुवारीस काळी निघाले. पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहचता यावे, यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून नियमित बसेस बरोबरच अलिबाग-पनवेल विना थांबा ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. स्थानकात विना थांबाचे तिकीट घेण्यासाठी पर्यटकांची रांग दिसून आली. मुंबई- गोवा, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जिल्हा मार्ग, अलिबाग-मुरुड अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे 90 हून अधिक वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यांच्या मदतीला होमगार्ड जवानदेखील घेण्यात आले होते. अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-पेण, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली.
पर्यटकांनी मारला, चिकन, मासळीवर ताव
थर्टी फर्स्ट निमित्ताने पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. 31 डिसेंबरला बुधवार असल्याने मटण, चिकनसह मासळीवर ताव मारण्यात आला. मात्र एक जानेवारीला गुरुवार तसेच थर्टी फर्स्टच्या दिवशी एकादशी असल्याने मटण खरेदीवर त्याचा परिणाम झाला. फक्त 30 टक्केच व्यवसाय झाल्याचे मटण विक्रेते यांनी सांगितले. यावेळेला पर्यटकांनी मटणापेक्षा चिकन व मासळीला अधिक मागणी होती, असे सांगण्यात आले.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत झाल्यानंतर पर्यटक बुधवारी सकाळी परतीच्या मार्गावर निघाले. पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. सर्व पर्यटक एकत्र निघाल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. कर्जतमध्ये वाहतूक कोंडी झाली. पोयनाड – पेझारी तसेच कुरुळ बेलकडे रस्त्यावर वाहनांची वर्दळ प्रचंड होती. ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-अभिजीत भुजबळ,
पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
