पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

ढवर-बेलकडे-अलिबाग रस्त्यावर वाहतूक कोंडी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन पर्यटक रविवारी दुपारपासून परतीच्या मार्गावर निघाले. यावेळी अलिबाग-रोहा मार्गावरील तसेच अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नागावपासून बेलकडे फाटा ते कुरुळपर्यंत वाहतूक कोंडीचा फटका पर्यटकांना बसला. दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या होत्या. दरम्यान, या मार्गावर एकही वाहतूक पोलीस दिसून आला नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

मे महिना संपून जून महिना उजाडला आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळेच्या खरेदीची लगबग सुरू झाली असून पर्यटकांनी रविवारी (दि.2) त्यांच्या परतीच्या मार्गावर जाण्याची तयारी केली. यावेळी काही पर्यटक सकाळी निघाले, तर काही पर्यटक दुपारी भोजन करून निघाले. काही पर्यटकांनी खासगी वाहनांतून जाणे पसंत केले. तर, काही पर्यटकांनी एसटी बसमधून जाण्याला पसंती दर्शविली. यामुळे मुंबई व पुणे जाण्यासाठी पर्यटकांची अलिबाग एसटी बस स्थानकात गर्दी दिसून आली. यातच जलवाहतूक बंद असल्याने एसटीवर प्रवाशांचा भार पडला. कर्मचारी अपूरे असतानादेखील पनवेलपर्यंत विना थांबा ज्यादा बसेसची व्यवस्था आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांच्या मार्गदर्शनानुुसार करण्यात आली.

तसेच खासगी वाहनाने परतीच्या मार्गावर निघालेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. अलिबाग-रोहा मार्गावरील ढवर ते कुरुळ या तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. अनेक वाहने संथ गतीने धावत होती. दुपारच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांसह पर्यटकदेखील त्रस्त झाले. दरम्यान, या कालावधीत एकही वाहतूक पोलीस नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version