कुरुळ ते बेलकडे वाहनांच्या रांगाच रांगा
| अलिबाग | प्रतिनिधी |
दोन अवजड वाहनांच्या चालकांचा मनमानी कारभार सोमवारी सकाळी समोर आला आहे. वाहने थांबवून दोघांमध्ये शाब्दीक वाद निर्माण झाल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते कुरुळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अन्य वाहन चालक व प्रवाशांकडून सांगूनदेखील ते दोघेही त्यांच्या या वादामध्ये मग्न झाले होते. त्याचा फटका सोमवारी सकाळी कामावर व अन्य कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना बसला.
शनिवारी व रविवार सुट्टीनंतर सोमवारी (दि.8) सकाळी अनेकजण नोकरी, व्यवसायानिमित्त जात होते. दरम्यान, अलिबाग-रोहा, रेवदंडा, मुरुडकडे जात असताना, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेलकडे ते कुरुळ रस्त्यावर एमएच-04-जीसी-9445 व एमएच-12-एसएक्स-8129 या क्रमांकाची दोन अवजड वाहने थांबल्याने दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
ओव्हरटेक करण्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाल्याचे समोर आले. त्यामुळे बेलकडे ते कुरुळ रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी झाली होती. अन्य वाहन चालकांकडून सांगूनदेखील त्या दोघांचे भांडण सुरूच होते. काही वेळाने त्यांच्यातील वाद मिटल्यावर दोघेही मार्गस्थ झाले; परंतु या दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत दोन्ही मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास झाला. अनेकांना निश्चित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला. या अवजड वाहनांच्या मनमानी कारभाराबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.