अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने 15 ऑगस्टपासून शासनाने निर्बंधात शिथिलता दिली आहे. त्याचबरोबर सलग तीन दिवस आलेल्या सुट्यामुळे पर्यटकांची पावले अलिबागसह जिल्ह्यात वळली आहेत. अलिबाग समुद्रावर पर्यटकांची मौज मस्ती पुन्हा पाहायला मिळत आहे.
शासनाने हॉटेल, लॉजिग, बारलाही शिथिलता दिली असल्याने हे व्यवसायिकही आनंदित झाले आहेत. दुसर्या कोरोनाच्या लाटेनंतर निर्बंधात अडकलेले नागरिक शासनाने शिथिलता दिल्याने आता पर्यटनासाठी आणि मूड रिलॅक्स होण्यासाठी अलिबागसह जिल्ह्यात रवाना झाले आहेत.
एप्रिल महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पुन्हा राज्यात निर्बंध लागू झाले. त्यामुळे पुन्हा समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे यावर जाण्यास पर्यटकांना, नागरिकांना बंदी करण्यात आली. चार महिन्यानंतर आता कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागला असल्याने शासनाने 15 ऑगस्ट पासून निर्बंधात शिथिलता दिली असल्याने पुन्हा सर्व व्यवहार 10 वाजेपर्यत सुरू होणार आहेत. रायगड जिल्ह्यातही निर्बंधात जिल्हाधिकारी यांनी शिथिलता दिली आहे. एकीकडे शिथिलता तर दुसरीकडे सलग आलेल्या सुट्यामुळे पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर पाच महिन्यानंतर पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. पण आता पुन्हा जिल्ह्यात पर्यटन सुरू झाले असल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन समुद्र किनारे पर्यटकांनी बहरले आहेत. समुद्र स्नानाचा तसेच किनार्यावर असलेल्या मोटार रायडिंग, सायकलिंग, घोडा गाडी, उंट सफारीचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. पर्यटन पुन्हा जिल्ह्यात सुरू झाल्याने स्थानिक व्यवसायिक, हॉटेल, लॉजिग व्यवसायिक हे सुद्धा आनंदित झाले आहेत. पर्यटक आल्याने हॉटेल, लॉजिगमध्येही बुकिंग सुरू झाले असल्याने पाच महिन्यानंतर पर्यटकांचा राबता जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.