पर्यटकांची जलमार्गाला पसंती

| अलिबाग | प्रतिनिधी |

नाताळ सणाच्या सुट्ट्या आणि थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी अलिबागमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. रस्ते मार्गाने वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने पर्यटक हे जलमार्गाला पसंती देत आहेत. त्यामुळे मांडवा येथे दररोज तुफान गर्दी होत असल्याचे दिसून येते.

शनिवार ते सोमवार असा तीन दिवसांचा विकेंड आला होता. त्यामुळे शुक्रवार सायंकाळपासूनच अलिबागकडे पर्यटकांची पावले वळली होती. मुंबईतून जलवाहतूकीने येण्यासाठी गेटवेला मोठ्या रांगा लागल्या होत्या. अलिबागकडे येताना जशी गर्दी होती, तशीच परतीच्या प्रवासात मांडवा बंदरात परिस्थिती पाहायला मिळाली. दुपारनंतर मांडवा बंदरात बोट पकडण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक सुविधा असल्याने पर्यटक या प्रवासाला अधिक पसंती देत असतात. पीएनपी, मालदार आणि अजंठा या जलवाहतूक व्यवसायिक बोटी आहेत. रविवारी अजंठामार्फत 71 फेऱ्या प्रवाशांना घेऊन बोटीने मारल्या, तर पीएनपी, मालदारमार्फत वीस फेऱ्या झाल्या. रविवारी दिवसभरात शंभरहुन अधिक जलवाहतूक बोटीने हजारो प्रवाशांना गेटवे येथे सुखरूप सोडले. मांडवा बंदर हे प्रवाशांनी हाऊस फुल्ल झाले होते. ज्यांना जलवाहतूकीचे तिकीट मिळाले नाही त्यांनी एसटी बसचा आधार घेतला होता. त्यामुळे बस स्थानकांवरदेखील प्रवाशांची गर्दी झाली होती. एसटी विभागाकडून जादा बसेसची सुविधा करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले.

अलिबागमधील बहुतांश हॉटेल, लॉजिंगचे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बुकींग झाले आहे. तसेच, एक दिवसांची पिकनीक साजरी करणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील दर दिवशी वाढत आहे. त्यामुळे एसटी बस, खासगी वाहने आणि जलप्रवासासाठी मोठी गर्दी होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता रायगड पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version