जंजिरा जलदुर्ग रविवारी निर्मनुष्य

Exif_JPEG_420

पर्यटकांची बाह्य दर्शन घेत घरवापसी

। मुरूड-जंजीरा । वार्ताहर ।

मुरुड पर्यटन क्षेत्रापैकी राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा किल्ला शुक्रवारपासून पुरातत्व विभागाकडून बंद करण्यात आला आहे. तरीही पर्यटक आपापली वाहने घेऊन राजपुरी, खोरा जेट्टीवर येऊन घरवापसी करीत असल्याचे रविवारी (दि.26) दिसून आले. परंतु, शिडाच्या बोटींतून राजपूरी जवळील जंजिराचे बाह्य दर्शन दाखविण्यात आले. जंजिरा कुलूपबंद असल्याने आतून निर्मनुष्य होता.

जंजिरा बंद असल्याने घरवापसी होण्याआधी मुरूड आणि काशीद समुद्राकडेकूच केले. समुद्रकिनारे रविवारी सकाळी पर्यटकांच्या वर्दळीने आधिक फुलून गेले होते. सकाळी सुमारे 150 वाहने दाखल झाल्याची माहिती मुरूड नगरपरिषद टोल नाका कर्मचारी यांनी दिली. तसेच, समुद्रात धडकी भरविणार्‍या मोठ्या लाटा उसळताना दिसत होत्या. अखेर जंजिर्‍याचे बाह्य दर्शन घेऊन आलेल्या पर्यटकांनी घरवापसी करणे पसंद केले.

अतिउत्साही हौसेला मोल नसते
जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी छोट्या मुलांपासून जेष्ठ मंडळीपर्यंतचे पर्यटक येत असतात हे खरे आहे. मात्र शनिवारी एक 8 महिन्याची गरोदर महिला देखील जंजिरा पाहण्यासाठी खोरा जेट्टीवर आली होती. जंजिरा बाहेरून तरी पहावा असे तिचे मत होते. तिचे डॉक्टर पती सोबत होते. प्रतिक्षलयात बसलेल्या महिलेला उसळणार्‍या लाटांची परिस्थिती पाहता सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने जाऊ नये असे सांगण्यात आले. तरीही आम्हाला जंजिरा पाहू द्या, असे म्हणत डॉक्टर पतीने आग्रह धरला. गरोदरपणाची एकूण स्थिती पाहता तिला जाऊ देण्यात मज्जाव करण्यात आला. म्हणजेच अतिउत्साही हौसेला मोल नसते, हेच यातून दिसून येते.
Exit mobile version