काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची महाजत्रा

। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

शनिवारी-रविवारी मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची महाजत्रा पाहायला मिळाली. यामुळे पर्यटकांमध्ये काशीद समुद्रकिनार्‍याची लोकप्रियता अफाट असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. रणरणत्या उन्हात समुद्रकिनारी पर्यटकांची बेफाट उपस्थिती आणि एन्जॉय मात्र अवाक करणारा दिसत होता. समुद्रकिनारी रुपेरी वाळूवर आणलेले सामान ठेऊन शेकडोंच्या संख्येने उपस्थित पर्यटक समुद्रातील आनंदाचा आस्वाद घेताना दिसत होते.

दिवसेगणिक काशीद समुद्रकिनारा देशभरात आधिक लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला असून भविष्यात मुरूड तालुक्यातील मोठ्या पर्यटन विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे. भविष्यात समुद्रमार्गे लवकरच मुंबई ते काशीदपर्यंत प्रशस्त रो-रो बोट सेवा सुरू होणार असून राज्य आणि देशभरातील पर्यटकांना सुरक्षित आणि आरामदायी जलसेवा उपलब्ध होणार आहे. काशीद समुद्रकिनार्‍याजवळ प्रशस्त अद्यावत जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. पर्यटकांसहित वाहने देखील या रो-रो मधून काशीद समुद्रकिनार्‍यावर आणता येतील अशी सुविधा आहे.

रविवारी सकाळपासून काशीद समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची प्रचंड मांदियाळी होती. कडक उन्हात देखील उथळ समुद्रात पाणी अंगावर घेत पर्यटक एन्जॉय करताना दिसून आले. दुपारी सुरू झाडाच्या सानिध्यात एकत्रित वनभोजन करून दुपारी 3 नंतर पर्यटक आपापल्या गावी जाण्यासाठी कूच करीत होते.

Exit mobile version