। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
माची प्रबळगडावर चढाईसाठी गेलेल्या दोन 17 वर्षीय अल्पवयीन पर्यटकांचा रस्ता चुकल्याने ते डोंगर परिसरात अडकले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने मदतीसाठी 112 क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी ग्रामस्थ आणि निसर्ग मित्र पनवेल यांच्या मदतीने शोधमोहीम राबवून दोघांची सुखरूप सुटका केली.
माहिती मिळाल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपेटे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे आणि सरदार वसेकर यांच्या पुढाकाराने बचावकार्य सुरू करण्यात आले. यावेळी माची प्रबळ गावातील रहिवासी नवनाथ पारधी आणि हरिश्चंद्र पारधी यांच्यासह पोलीस अंमलदार, निसर्ग मित्र संस्था पनवेल आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. डोंगरातील वाटा आणि परिसराची स्थानिकांना असलेली माहिती बचावकार्यात महत्त्वाची ठरली. शोधपथकाने योग्य दिशेने शोधमोहीम राबवत दोन्ही मुलांचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर दोन्ही अल्पवयीन पर्यटकांना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची खात्री केल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे तसेच ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली.






