पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत

एक ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

उन्हाळी सुट्टीच्या हंगामात चाकरमान्यांसह पर्यटकांचे रायगड जिल्ह्यात आगमन सुरू झाले असून, एसटी, खासगी बसेसच्या संख्येत वाढ झाल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग, पेण, अलिबाग रेवदंडा, नेरळ, माणगाव या भागात वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागत असल्याने होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह पर्यटक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पर्यटकांना त्यांच्या निश्‍चित स्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. आधीच उष्णतेने अंगाची लाही लाही होत असताना, रखरखत्या उन्हात तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने पर्यटक हैराण झाले आहेत.

रायगड जिल्हा पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. येथील समुद्रकिनारा, नारळी, पोफळीच्या बागा पर्यटकांच्या कायमच पसंतीस उतरल्या आहेत. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली आहे. मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. काही पर्यटक शनिवार व रविवार साप्ताहिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. उन्हाचे चटके जाणवत असल्याने पर्यटकांनी अलिबाग, मुरूड, काशीद, नागाव, श्रीवर्धन, किहीम, आक्षी, मांडवा आदी समुद्रकिनारी फिरण्यास पर्यटकांनी महत्त्व दिले आहे. रविवारी पर्यटकांनी समुद्रकिनारे फुलून गेले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. चारफाटासह पेण, अलिबागमधील रिलायन्स बायपास, इंदापूर, माणगाव, खारपाडा, अलिबाग, रेवदंडा मार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा एक ते दोन किलोमीटर अंतरावर दिसून आल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. ते अपूर्ण स्थितीत असल्याचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसत आहे. त्यामुळे सरकारच्या कामांबाबतदेखील पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सोपवण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेत 90 वाहतूक पोलीस देण्यात आले आहेत. मात्र, रविवारी पर्यटकांची गर्दी असतानादेखील त्याठिकाणी फक्त 30 वाहतूक पोलिसांच्या भरोवशावर वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी वाहने संथगतीने धावत असल्याने पर्यटकांना त्यांच्या निश्‍चित स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे बोलण्यात आले आहे. उर्वरित वाहतूक पोलिसांना निवडणुकीच्या कामात पाठविल्याचा फटका बसला.


मुंबई-गोवा महामार्गावरील पेण या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातील माणगाव, अलिबाग, पेण आदी मार्गांवर वाहनांच्या रांगा आहेत. वाहने संथगतीने चालत आहेत. वाहतूक कोंडी नाही. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली आहे.

अनिल लाड, पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

दरवर्षी सुट्टीच्या दिवशी गावी आम्ही येतो. मात्र, वेळेवर गावी पोहोचल्याचा आनंदच मिळाला नाही. दरवर्षीप्रमाणे महामार्गावर व अलिबाग-पेण मार्गावर वाहतूक कोंडी आढळून आली आहे. तीच परिस्थिती आजही आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणावरही सरकारने भर देणे आवश्यक आहे.

सुवर्णा जाधव, पर्यटक
Exit mobile version