कामगार संघटनांचा भारत बंद

केंद्राच्या विरोधात कामगार संघटनांची एकजूट
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने पाठिंबा दिलेल्या केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने सोमवारी 28 आणि मंगळवारी 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. कामगार, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर विपरित परिणाम करणार्‍या केंद्राच्या धोरणांविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळं बँकिंग, ट्रान्सपोर्ट यांसह विविध सेवांवर यामुळं परिणाम होण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या या धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं चर्चेसाठी 22 मार्च रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत 28 आणि 29 मार्च रोजी संप पुकारण्याबाबत निर्णय झाला. बैठकीत ठरलं की, विविध कामगार संघटना केंद्राच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, राष्ट्रविरोधी आणि सामान्य नागरिकांच्या विरोधातील धोरणांविरोधात निषेध करायचा. यामध्ये बँक संघटनांचाही सहभाग असणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात तसेच बँकिंग सुधारणा कायदा 2021 विरोधात या संघटना संपात सहभाग नोंदवणार आहेत.

रस्ते, वाहतूक कर्मचारी आणि वीज कामगारांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कामगार संघटनांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. रेल्वे कामगारांच्या संघटना आणि संरक्षण क्षेत्रातील कामगार देखील या संपाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेकडो ठिकाणी एकत्र येतील. त्याचबरोबर कोळसा, स्टील, तेल, टेलिकॉम, पोस्टल, इन्कम टॅक्स आणि इन्शुरन्स या क्षेत्रातील कामगार देखील या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे, असंही या निवदेनात म्हटलं आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं या संपाबाबत म्हटलं की, संपामुळं बँकिंग सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. आमची एसबीआयच्या खाशांना सल्ला आहे की, त्यांनी बँकिंग व्यवहार सुरळीत चालावेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

Exit mobile version